गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

समता संघर्षाच्या पुन्हा पेटवा मशाली ...!

 पुण्याच्या अनुज बिडवे याची इंग्लंडमधील  मंचेस्तारमध्ये वंश विद्वेषातून हत्या झाल्यानंतर  प्रसारमाध्यमामध्ये  बातम्या येत आहेत . चर्चाही मोठ्या  प्रमाणात  झडत आहेत. ब्रिटीश सरकार आणि मंचेस्तर पोलीस वंश विद्वेषाचा  मुद्धा नजरेआड  करीत आहेत  काय ? न्याय  मिळण्यासाठी चोहोबाजूंनी चर्चा केली जात आहे . परंतु देशातील दलितांवरील विखारी जातीयवादातून होणाऱ्या अन्याय _अत्याचारांच्या  घटनाचे येथील राज्यकर्त्यांना , सिविल सोसायटीला आणि  प्रसारमाध्यमाना काहीच सोयरसुतक नाही. आज भारत स्वतंत्र होऊन ६४ वर्षे  उलटली . तरी जातीवाद , विषमता  संपताना दिसत नाही.  एकीकडे महासत्तेची स्वप्ने पाहतोय  तर दुसरीकडे जातीवाद इथल्या समाजव्यवस्थेला कॅन्सरसारखा  पोखरतोय . देशात दलित-आदिवासिवरील  अत्याचारात वाढ झाल्याची आकडेवारी  गतवर्षी  जून महिन्यात केंद्रीय सामाजिक न्याय  मंत्री मुकुल वासनिक यांनी जाहीर केलेली आहे . प्रामुख्याने महाराष्ट्रात  आणि त्यातही मराठवाड्यातील दलितांना जातीवादाचे चटके अधिक सहन करावे लागत आहेत . मराठवाडा विध्यापिठच्या  नामांतर  आंदोलनापुर्विपासुंच इथला मराठा  समाज  जातीयवादातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत नाही . हे वेळोवेळी  सिद्ध झालेले आहे . कुठ आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक केली जाते .तर कुठे दलीन्ताच्या स्मशानभूमीवर  अतिक्रमण करून त्यांना मेल्यावरही  अंत्यसंस्कार करण्यास मज्जाव केला जातो . किरकोळ कारणावरून त्यांना जातीवाचक शिवीगाळ, मारहाण केली जाते .एवढेच नाही तर त्यांची हत्या केली जाते.येनकेन प्रकारे दलितांच्या विकासात अडथला आणला जातो . याची दाद फिर्यादही प्रशाशनात बसलेले जातीवादी लोक घेत नाहीत .महाराष्ट्राचे कर्तेधर्ते समजणाऱ्या राज्यकर्त्यांच्या नसणासातील जातीवादाचा प्रत्येय इथल्या दलित-आदिवासींना आलेला आहे. मनुस्म्र्तीच्या समर्थकांनी  इथल्या मराठा  समाजाच्या डोक्यात जातीवाद्ची केलेली पेरण  जाता जात नाही.हे परिवर्तनवादी, पुरोगामी मान्हुवून घेणाऱ्या तथाकथित विचारवंत आणि राज्याकार्त्यासामोरील  एक  मोठे आव्हान आहे. एका ताज्या घटनेमुळे मराठवाड्यातीलच नाही तर सबंध महाराष्ट्रातील दलिताच्या सुरेक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ५ जानेवारी २०१२ रोजी  परभणी जिल्ह्यातील भोगाव साबळे येथील बौद्ध वस्तीवर मराठा समाजाने लाठ्या काठ्यानी हल्ला चढविला .दिसेल त्याला मारहाण केली. यात गर्भ्वातीनही सोडले नाही. दलिताचे घर जाळले , कारण काय  तर २१ डिसेंबर २०११ रोजी तेथील बौध्द समाज  बांधवानी इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांच्या आंतरराष्ट्रीय  स्मारक साठी केंद्र सरकारने देण्याचे मान्य केल्याने गावात केलेला आंदोत्स्व .उपेक्षित बौद्धांनी गावात आंदोस्तोव साजरा केल्याने जातीयवाध्याना पोटसूळ  उठला .मराठा  समाजातील काही जातीयवाध्यानी बौद्ध समाजातील आनासाहेब पुंदगे आणि संजय कचरू पुंदगे यांना जातीवाचक शिवीगाळ करीत जबर मारहाण केली होती. त्यामुळे येथील चार जातीयवाद्ध्याविरुद्ध atrosity  कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले होते .याचा राग मनात धरून  बौद्ध वस्तीतील समाज मंदिरासमोर माणिक साबळे ,अजित साबळे  या जातीवादी गावगुंडानी जातीवाचक शिवीगाळ करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचीत्राची विटम्बना केली.लहाडे यांच्या घरावर हल्ला केला .दलित समाजातील महिला -पुरुषांना जबर मारहाण केली. लहाडे यांच्या घराला आग लावली.यात त्यांचा संसार जाळून खाक केला .अनेकांचे संसार उघड्यावर पडले .गावातील वाहने बंद केली. ग्रामस्थांनी दलितावर बहिष्कार टाकला.गावातील दलित समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.या भयानक घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या भीमशक्ती चे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह जिल्हाधिकारी गलांडे यांची भेट घेऊन भोगाव यथील पिडीत दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच जातीवादी आरोपींना अटक करावी यासाठी निवेदन दिले.या शियाय कुठल्याही स्थानिक लोकप्रतिनिधीला या घटनेची गांभीर्याने दाखल घ्यावीशी वाटली नाही प्रस्थापित प्रसारमाध्यामानी या घटनेला कवरेज दिले नाही .कसे  देणार ? तेथेही जातीवादी पिलावळ आहेच  न!मराठवाड्यातल्या खेड्या-पाड्यात जातीवादी कारवाया कोण करते आहे ? मनुस्मृतीच्या समर्थकांनी भूतकाळात दलितावर अतोनात अत्यचार केले .पण आज मनूचा प्रभाव असलेला मराठा समाज दलितावर अत्याचार करीत आहे. हे बुद्ध आणि  डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांना मानतो असे म्हणणाऱ्या मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांना दिसत नाही का? त्यांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी काय उपक्रम राबविले आहेत ? राबवीत आहेत ? महासत्तेची स्वपने  पाहणारे इथले तथाकथित राज्यकर्ते ,बुद्धीजीवी  विचारवंत इथला जातीवाद संपविण्यासाठी काय उपाय योजना करीत आहेत ? विषमतेच्या छातीवर समतेचे कलमीकरण करण्यासाठी ज्या क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवतोड प्रयत्न केले .त्यांचा वारसा कोण जतन करीत आहे? इथल्या गोरगरीब दिन-दलीतामध्ये सुरक्षेची भावना कशी आणि कधी निर्माण होईल ?असे एक न अनेक प्रश्न समाजाला भेडसावत आहेत .पण अशा परिस्थितीत समाजात समतेचा झेंडा रोवण्यासाठी आंबेडकरी अनुयायांना आता पुन्हा समतेच्या संघर्षासाठी माश्ली पेटवाव्या  लागतील ...अन्यायाचा  प्रतिकार  लोकशाही मार्गाने करण्यासाठी मुठी आवलाव्या  लागतील ...इथल्या जातिवाद्यांना धडा शिकविण्यासाठी .

                                                                                                                       *      शिवाजी  कांबळे

बुधवार, ४ जानेवारी, २०१२

प्रेस कौन्सिलनं टोचले महाराष्ट्र सरकारचे कान


एखादा कायदा अथवा जनहिताची मागणी मान्य करायची नसेल किंवा ती होऊ द्यायची नसेल तर सत्ताधारी आणि विरोधक कशाप्रकारंचं कटकारस्थान करू शकतात हे ऊभ्या देशानं लाकपालवरून लोकसभा आणि राज्यसभत जे रणकंदन झालं त्यानिमित्तानं पाहिलं.लोकपाल विधेयक कॉंगे्रसनं मांडलं.ते मंजूर करून घेण्याची जबाबदारी देखील त्यांचीच होती.त्यांनी ती जबाबदारी पाड पाडली नाही.कारण सशक्त लोकपाल यावा अशी कॉगे्रसची इच्छाच नाही.विरोधकांचीही नाही.त्यामुळं ना ना क्तुप्त्या करून राज्यसभेत विधेयक मंजूर होणार नाही अशी व्यवस्था केली गेली.आज सारेच" ब्लेम गेम'मध्ये गुंतले आहेत.म्हणजे विधेयक मंजूर झालं नसेल तर त्याला विरोधक जबाबदार आहेत असं कॉगे्रस म्हणतेय आणि विधेयक मंजूर न होण्याचं खापर विरोधक सत्ताधाऱ्यांच्यावर फोडत आहेत.मला असं वाटतं सशक्त लोकपाल कोणालाच नकोय.त्यातून हे सारं राजकारण शिजलं.सशक्त लोकपाल आला तर  एक़ट्या कॉगे्रसचीच अडचण होईल असं नाही अडचण भाजपचीही होणार आहे. कारण ते फार धुतल्या तांदळासारखे आहेत असं नाही.लोकपाल नको आहे पण तो नको आहे हे दाखवायचं नाही.अशी साऱ्यांचीच नीती असल्यानं त्या विधेयकाचं त्रागडं झालं.एखादा विषय मंजूर करायचा असेल तर सभागृहातील सारे सदस्य एकत्र झाल्याचं चित्र अनेकदा देशानं पाहिलं आहे.विशेषतः खासदारांचं वेतन आणि भत्ते वाढीचा विषय असेल तर सारे एकत्र येतात आणि तेथं कोणत्याचा तांत्रिक अडचणी येत नाहीत.म्हणजे राजकारण्यांनी ठरविलं तर काहीच अशक्य नाही.पण आपले हितसंबंध धोक्यात येणार नाहीत अशाच गोष्टी ते ठरवतात.कायदे तसेच करतात.देशहितापेक्षा,जनहितापेक्षा राजकारण्यांना स्वहित आणि स्वपक्षीय हित महत्वाचं वाटतं.लोकपालमुळं त्यांचं हे हित धोक्यात येणार असल्यानं त्यांनी ते मान्य होणार नाही अशी चलाखी चालविली आहे.लोकपालबद्दलच ही चलाखी आहे असं नाही.महिला आरक्षणासारखे अनेक विषय आहेत ते धूळ खात पडले आहेत.महाराष्ट्रात अंघश्रध्दा  विरोधी विधेयकाचेही असंच आहे.ते कोणालाच नकोय.मग तसंच पडू द्या अशी भूमिका घेतली जातेय. राजकारण्यांच्या या भूमिकेचा फटका आम्हा पत्रकारांनाही बसत आहे.आता सहा वर्षे झाली ,आम्ही पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा राज्यात करावा अशी मागणी करीत आहोत.या मागणीकडं हेतूतः सर्वपक्षीय दुर्लक्ष होतंय.याचं कारण असा कायदा झालाच तर' इझी टार्गेट' ठरणाऱ्या पत्रकारांना सोलून काढता येणार नाही ही भिती राजकीय पक्षांना आहे.मी वारंवार स्पष्ट करीत आलोय की.पत्रकारांवर जे हल्ले होतात किंवा झाले आहेत त्यातील ९५ टक्के हल्ले राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून अथवा कार्यकर्त्यांकडून झालेले आहेत .असे हल्ले करणाऱ्यांमध्ये एकच पक्ष आहे असं समजण्याचं कारण नाही.प्रमाण कमी अधिक असेल पण पत्रकारांना चोपून काढण्यात सारेच पक्ष आघाडीवर आहेत.त्यामुळं पत्रकारांना कायध्यांनं संरक्षण मिळालंच पाहिजे या आमच्या मागणीचा हिरीरिनं कोणी पुरस्कार करीत नाही अथवा त्याचा पाठपुरावाही करीत नाही.कायद्याला विरोधकही फार अनुकूल नाहीत म्हटल्यावर राज्यातील सत्ताधारी नवनवी कारणं शोघत असतात.जेडे यांची हत्त्या झाल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी "विधेयक सभागृहात मांडतो .मंजूर होईल की नाही मी सांगत नाही' असं आश्वासन कॅमेऱ्यासमोर दिलं होतं.ते साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलं,एकलं होतं.ते पाळलं गेलं नाही.विधेयक आणण्याऐवजी नारायण राणे समिती नेमली गेली.पत्रकार संरक्षण कायद्याच्या संदर्भातली राणे यांची मतं जगजाहीर असताना त्यांनाच समितीचं अघ्यक्ष करून सरकारनं आपली नियत साफ नाही हेच दाखवून दिलं होतं.अपेक्षेप्रमाणं राणे समितीनं "पत्रकारांना संरक्षण देणाऱ्या कायद्याची गरज नाही' असा अहवाल दिला.तो "पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती'ला मान्य असण्याचं कारण नाही.समितीनं या विरोधात नागपुरात मोर्चा काढला.नंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो.तिथं त्यांनी ठोस असं काहीच सागितलं नाही पण दोन गोष्टी करतो म्हणून सांगितलं.त्यातली पहिली गोष्ट म्हणजे राणे समितीशी चर्चा करतो आणि दूसरी गोष्ट म्हणजे राणे समितीचा अहवाल कॅबिनेट समोर मांडतो.सरकारनं दोन्ही गोष्टी केल्या नाहीत.त्या केल्या असत्या तरी त्यातून निष्पण्ण काहीच होणार नव्हतं.तरीही सरकारनं काही केलं नाही.विरोधी पक्षानं आमच्या मागणीला पाठिंवा दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारही मानले.विरोधकांनी  सभागृहातही हा विषय मांडला  पण "विषय लावून धरणं 'जे काही असतं ते विरोधकांनी केलं नाही.त्यामुळं थातूर-मातूर गोष्टी सांगत आणि कायदा करणारच असं खोटं आश्वासन देत फोजिया खान यांनी हा विषय बासनात गुंडाळून ठेवला.म्हणजे वरती लोकपाल संबंधात जे नाट्य घडतंय तसंच महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याच्या बाबतीत सुरू आहे.फरक एकच आहे.आमची मागणी एका घटकापुरती मर्यादित आहे.त्यामुळं त्याचा गवगवा कमी होतो.लोकपालची मागणी व्यापक असल्यांनं त्याची चर्चा होते.पण दोन्ही कायदे होऊ न देण्यामागचं कादरखानी डोकं मात्र समान आहे.लोकपाल असो नाही तर पत्रकार संरक्षण कायदा असो हे कायदे झाले तर त्याचे थेट बळी आपणच ठरणार आहोत हे राजकारण्यांना ज्ञात आहे.कारण " भ्रष्टचार करणारे आणि पत्रकारांवर हल्ले करणारे 'राजकारणीच आहेत हे इथं वेगळं सांगण्याची गरज नाही.पण राजकाऱण्यांनी कितीही डावपेच आखले तरी ना अण्णा गप्प बसतील ना महाराष्ट्रातील पत्रकार.कायदा होईपर्यत दोन्ही लढाया सुरूच राहणार आहेत यात शंका नाही.

                          प्रेस कौन्सिलनं कान पिरगळले
                                ---------------------
 राजकारणी असोत की,सत्ताधारी ते काही जहागिरदार नाहीत.त्यांची मनमानी जरूर काही काळ चालते पण ती नेहमीच चालेल असं नाही.आपल्याला विचारणारंही कोणी नाही अशा भ्रमात त्यांनी राहण्याचं कारण नाही.दर पाच वर्षांनी जनता जाब विचारतच असते.शिवाय वेगवेगळ्या व्यवस्थाही प्रसंगानुरूप सरकारला सूचना करीत असतात,आदेश देत असतात.त्याकडं सरकारला दुर्लक्ष करता येत नाही.देशातील वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी होणार नाही याची काळजी घेणारी एक व्यवस्था "प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया'च्या रूपानं देशात अस्तित्वात आहे.प्रेस कौन्सिलचं काम काय आणि त्याचा दर्जा काय हे दोन वाक्यात सांगायचं तर असं सांगता येईल की,it is a statutory , quasi judicial body which act's as a watchdog of the press.it adjudicates the complaints against and by the press for violation of ethics and for violation of the freedom of the press respectively . प्रेस कौन्सिलनं वेळोवेळी आपली भूमिका समर्थपणे पार पाडलेली आहे.आता प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती मार्कण्डेय काटजू.त्यांनी आपल्या कार्यकाळात वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी अनेक ठोस भूमिका पार पाडल्या आहेत.काही दिवसांपूर्वीत काटजू यांनी जम्मू आणि काश्मीर सरकारला एक पत्र पाठवून "जर यापुढे पत्रकारांवर शारीरिक हल्ले झाले तर प्रेस कौन्सिल पोलीस आणि प्रशासकीय अधिका़ऱ्यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचे खटले दाखल करील"असं स्पष्ट केलंय.त्यांनी पुढे स्पष्ट केलं आहे की," एखादा वकील आपल्या आशिलाचा न्यायालयात बचाव करताना जशी केवळ आपली ड्युटी पार पाडत असतो त्याच प्रमाणे एखाद्या   घटनेचं वार्तांकन करीत असताना पत्रकार केवळ आपली ड्युटी बजावत असतो.वकिल गुन्हगाराची बाजू मांडतो म्हणजे तो गुन्हेगार असत नाही त्याच धर्तीवर पत्रकार एखाद्‌या घटनेचं वार्तांकन करतो म्हणजे तो त्या घटनेचा भाग असत नाही,त्यामुळं पत्रकारावर कारवाई करता येत नाही "असे त्यांनी पोलीस आणि प्रशासनाला उद्देशून स्पष्ट केलं आहे.महाराष्ट्रात पोलिसांकडून पत्रकारांवर होणाऱ्या छळाच्या धटनांच्या पार्श्वभूमीवर न्या.काटजू यांचे वरील विश्लषण नक्तीच दिलासा देणारं आहे.जम्मू-काश्मीर मधील पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनांची दखल धेणाऱ्या न्या.काटजू यांना महाराष्ट्रात पत्रकारांवर हल्ले करून वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या नऱडीलाच कसे नख लावले जात आहे याबद्दल काही अवगत नव्हतं असं नाही.पण ते महाराष्ट्र सरकार काय दिवे लावतंय याची वाट बघत होते.महाराष्ट्र सरकारनं वृत्तपत्र स्वातंत्र्य टीकविण्याच्या दृष्टीनं केवळ टोलवा-टोलवी चालविली आहे हे जेव्हा न्या.काटजू यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी २६ डिसेंबर रोजी पत्र लिहून "सरकार महाराष्ट्रातील पत्रकारांच्या रक्षणासाठी काय करीत ? आहे आणि भविष्यात काय करणार आहे?' अशी विचारणा केली आहे.महाराष्ट्रातील पत्रकारांच्या जिगरबाज कार्याचं तोंडभरून कौतूक करताना न्या.काटजू यांनी पत्रात म्हटलं आहे की,"जळगाव सेक्स स्कॅन्डल,खैरलांजी हत्याकांड.नगर जिल्ह्यातील कोठेवाडी येथील वृध्द महिलांवर केल्या गेलेल्या अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रातील पत्रकारांनी हिंमत दाखवून प्रकाशात आणल्या.या सर्व घटनाचा पाठपुरावा पत्रकारांनी केला नसता तर या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीनं या घटना दाबल्या असत्या.या घटना उजेडात आणणाऱ्या पत्रकारांचा मानसिक छळ केला गेल्याचं मला सांगण्यात आलं असंही न्या.काटजू यांनी स्पष्ट केलं आहे.पुण्याचे पत्रकार योगेश कुटे,बुलढाण्याचे पत्रकार गणेश सोलंकी यांच्यावरील हल्ले किंवा जेडे यांची झालेली हत्त्येच्या विरोधात पत्रकार संघटनांनी आंदोलनं केली पण महाराष्ट्र सरकारनं केवळ आश्वासना खेरीज काहीच केलं नाही.याचा अर्थ सरकार पत्रकारांवरील हल्ल्याच्या संदर्भात गंभीर नाही.'असेही न्या.काटजू यांनी स्पष्ट शब्दात राज्य सरकारला सुनावलं आहे.न्या.काटजू एवढ्यावरच थांबले नाहीत तर नाराय़ण राणे समितीच्या अहवालाबद्दल नासंती व्यक्त करीत "राणे समितीनं पत्रकारांना संरक्षणासाठी विशेष काही करण्याची गरज नाही असं आपल्या अहवालात म्हटल्याचं मला सागण्यात आलं आहे.आपण या अहवालाची प्रत मला तातडीनं पाठवावी.अहवाल पाहिल्यानंतर त्यावर  काही भाष्य करता येईल मात्र त्यांनी पत्रकारांना संरक्षण देण्याची भूमिका घेतली असेल तर ती स्वीकारण्यासारखी नाही.आपल्या राज्यात पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना वाढत असल्यानं पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत पण राज्य सरकार यासंदर्भात गंभीर नसल्याचा आरोपही' न्या.क़ाटजू यांनी केला आहे.न्या.काटजू यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, "प्रेस कौन्सिल कायद्याच्या कलम १३ मध्ये म्हटलं आहे की,आपलं  कर्तव्य बजावत असताना पत्रकारांवर होत असलेल्या शारीरिक हल्ल्यापासून पत्रकारांचे संरक्षण करणे हे  प्रेस कौन्सिलचे कर्तव्य आहे.याच कायद्याच्या कलम 19(1)(ए) मध्ये म्हटलं आहे की,भारतात वृत्तपत्र स्वातंत्र्य हा मुलभूत हक्क (Fundamental right) आहे.याचा अर्थ पत्रकारांवरील हल्ला हा या मुलभूत अधिकाराचेच उल्लंघन आहे.ते  प्रेस कौन्सिल कदापिही सहन करणार नाही 'अशी तंबीच  प्रेस कौन्सिलनं दिली आहे.

    एवढे दिवस आम्ही ज्या भाषेत बोलत होतो त्याच भाषेत  प्रेस कौन्सिलनं आता महाराष्ट्र सरकारची कानउघाडणी केल्यानं सरकारला आता काही तरी भूमिका घेणं भागच आहे.मात्र न्या.काटजू यांच्या पत्राकडे मी वेगळ्या भूमिकेतून बघतो.महाराष्ट्रातील पुढारी नेहमीच येथील कायदा आणि सुव्यवस्था तसेच पुरोगामीत्वाच्या बाता मारत असतात.न्या.काटजू यांच्या पत्रानं हे पुढारी आता उघडे पडले आहेत.न्या.काटजू यांच्या पत्राची बातमी नॅशनल मिडीयानं कव्हर केल्यानं सरकारच्या नाकर्तेपणाचा पंचनामा देशभर झाला आहे.ज्या राज्यात वृत्तपत्र स्वातंत्र्याची आतापर्यत बूज राखली गेली त्याच महाराष्ट्रात  आज वृत्तपत्र स्वातंत्र्यासमोरच गंभीर धोका निर्माण झाल्याचं चित्र जगासमोर आलंय.महाराष्ट्रंानं अनेक  पुरोगामी देशात कायदे सर्वात प्रथम केल्याचा बडेजाव मारणाऱ्या राज्यकर्त्यांना वृत्तपत्र स्वातंत्र्य टीकविण्यासाठी आवश्यक असणारा आणि पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा असं वाटत नाही हेही वास्तव जगासमोर या पत्राच्या निमित्तानं आलं.मला वाटतं महाराष्ट्र सरकारच्या अब्रूची लक्तर अशा पध्दतीनं यापूर्वी कधी निघाली नसतील.सरकारला आमची पुनश्च विनंती आहे,"झालं एवढं वस्त्रहऱण पुरे झालं आता विषय अधिक न ताणता सरकारनं तातडीनं वटहुकूम काढावा आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याशी आम्ही तडजोड करणार नाही' हे  प्रेस कौन्सिलला दाखवून द्यावं.मुख्यमंत्री चव्हाण यांनी आता कोणाच्याही दबावाखाली न येता  हे करावं असंच आमचं त्यांना सांगणं आहे.कारण या प्रकरणात छुपा विरोध करणारे बाजूला राहातात.बदनामी चव्हाण यांची होत आहे. प्रेस कौन्सिलनंही आता त्यांनाच थेट सवाल केलेला आहे. प्रेस कौन्सिलच्या पत्राला थातूर-मातूर उत्तर देण्यापेक्षा त्यांनी कायदा करून उत्तर द्यावं एवढीच महाराष्ट्रतील एक पत्रकारांची अपेक्षा आहे.राज्य सरकारच्या नादान कारभाराची  जास्त लक्तरे आता वेशीवर टांगू नका त्यात बदनामी राज्यातील जनतेचीही आहेच.
    एस.एम.देशमुख

मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

पेशवेशाहीचा पाडाव करून समाजाला व्रर्णव्यास्थेतून मुक्त करणाऱ्या महार बटालीयनच्या शूरवीरांना क्रांतिकारक अभिवादन !


भारतात अनेक पकारच्या लढाया झाल्या. पण महाराष्ट्रातील पुणे जिह्यात भिमाकोरेगाव येथे पेशवे विरूद्ध महारसैनिक जी लढाई झाली `ती न भुतो न भविष्यती' होती. म्हणजे अशी लढाई मागे ही झाली नाही आणि पुढेही कधी होणार नाही. या लढाईत 500  महारसैनिकांनी 25000 हजार  पेशव्यांचा धुव्वा उडविला तर काही जायबंदी करून टाकले तर काहींना धरणीवर लोळविले, काहींचे मुडदे पाडले, तर काहीजणांना पळती भूई थोडी करून टाकली. अशा पद्धतीन धाडसी शुर, वीर, जाबाज महारसैनिकांनी पेशव्यांची दाणादाण करून टाकली. आजही या लढाईची आठवण  महारसैनिक म्हणजे आजचे भिमसैनिक यांच्या स्मरणात आहे. ही लढाई का घडली? कशी घडली? आणि कोठे घडली? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. ही लढाई घडण्यापूर्वी पेशव्यांना पुणे काबिज करावयाचे होते. पेशव्यांकडे धारदार शस्त्रास्त्रs, तलवारी, भाले, कुऱहाडीही होत्या. 25000 पेशव्यांचा फौज फाटा पुणे काबिज करण्यासाठी चालून येत आहे. याची कुणकुण गोऱया अधिकाऱयांना आधीच लागली होती. 25000 पेशव्यांचा फौज फाटा म्हटल्यानंतर सहाजिकच काळजाचे ठोके वाढणारच, काळजात धस्स होणारच. पुणे आणि नगर रस्त्यावर असलेले भिमाकोरेगावच्या रस्त्यांनी एक गोरा शिपाई पुण्याहून शिरूरला निघाला होता. त्या शिपायास कमांडर बटर्नरचे पत्र शिरूर छावणीला पोचवायचे होते. त्याकाळात वाहनांची फारशी सुविधा नव्हती. हत्ती किंवा घोडे या पाण्यांचा वापर त्यावेळस होत असे. सगळीकडे घनदाट जंगल होते. हत्ती, वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, कुत्रे यापासून जीवाचे रक्षण करणे महत्वाचे होते. अचानक एक गोरा शिपाई शिरूर छावणीत त्याचे आगमन झालेले पाहून शिरूर छावणीचे गोरे अधिकारी ही अचबिंत झाले.  त्या गोऱया शिपायाने मी कमांडर बटर्नरचे पत्र घेऊन आलो असल्याचो सांगितले. बटर्नरचे पत्र वाचल्यानंतर शिरूर छावणीतील गोऱया अधिकाऱयांना घाम सुटला. लेफ्टनंट कर्नल फिल्समन या गोऱया अधिकाऱयांना पत्र वाचल्यानंतर जो घाम सुटला आणि जी त्यांची दयनीय अवस्था झाली ती खरोखरच पाहण्यासारखी होती. अतिशय कडाक्याची थंडी असूनही त्याला घाम सुटला होता. जणु तो काही घामाने न्हाऊनच निघाला होता. असे काय होते त्या  पत्रामध्ये लिहिलेले. त्या पत्रामध्ये कमांडर बटर्नर कळविले होते की, दुसरा बाजीराव पेशवा 25000 सैन्य घेऊन पुणे काबिज करण्यासाठी येत आहे. शस्त्रास्त्रासह तो अफाट फौज घेउढन येत आहे. पुण्याकडे आगेकुच करत आहे. तेव्हा पुण्यातील ब्रिटीश आर्मीकडे फौज कमी आहे. तुम्हीसुद्धा फौज फाटा घेऊन यावे. सध्या चाकणे या ठिकाणी पेशव्यांची फौज तळ ठोकून आहे. तर पेशवे सैनिकांच्या पाठीमागे जनरल स्मिथ आपल्या फौजेनिशी पाठलाग करत आहे. लेफ्टनंट कर्नल फिल्समनने सर्व पत्र वाचले आणि तो स्वतशीच विचार करू लागला. येणाऱया पसंगाला कसे तोंड द्यायचे असा तो विचार करू लागला. पेशव्यांना भूईसपाट करण्यासाठी जर कुठली शुर, वीर, आणि धाडसी जमात असेल तर ते फक्त महार सैनिक आहे हे त्याच्या लक्षात आले. लेफ्टनंट कर्नल फिल्समन महारसैनिक असलेल्या बॉम्बे इन्फंट्रीच्या पहिल्या रेजिमेंटची दुसरी बटालियन त्याला डोळ्यासमोर दिसू लागली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता पुढील कारवाई त्वरीत सुरू केली.  या महारसैनिक असलेल्या बटालियनमध्ये 500 महारसैनिक होते.
फिल्समन कर्नल फिल्समन यांच्या नेतृत्वाखाली शिरूर ते कोरेगाव येथपर्यंत पायी चालत आले होते. पेशव्यांना धुळ कशी चारायची याचीही योजना करण्यात आली होती. ही लढाई डोंगरावर किंवा कोणत्या किल्ल्यावर होणार नव्हती तर ही लढाई समोरासमोर सपाट जमिनीवर होणार होती. ब्रिटिश सैनिकांची आणि पेशव्यांची भेटगाठ भिमाकोरेगाव येथे पडली. आणि येथून पुढे जे घडले त्याची कोणी कल्पनाही करणार नाही. पेशव्याच्या अफाट सैनिकांनी महारसैनिकांवर हल्ला चढविला त्यावेळी महारसैनिक बेसावध होते. पेशवे कोणत्याही क्षणी हल्ला करतील याची त्यांना कल्पना होतीच. महारसैनिकांनी अत्यंत चालाखीने पेशव्यांना घेरले. धाडसी शुर, वीर, महारसैनिक ही आपल्या जिवाची पर्वा न करता पेशव्यांच्या सैनिकावर तुटून पडली. तलवारीला तलवारी भिडल्या होत्या. सपासप एकदुसऱयावर वार होत होते. पेशव्यांचे मुडदे पडल्या जात होते. एकटा म्हणजे एक महारसैनिक 40 ते 50 पेशवे सेनिकाबरोबर लढत होते. आपल्या जिवाची पर्वा न करता महारसैनिक शत्रु वर तुटून पडले होते. छातीला छाती भिडवून, तलवारीला तलवार भिडवून, न घाबरता न डगमता, शत्रूवर वार करून त्यांना धरणीवर लोळवले जात होते. आणि घरादाराची बायकापोरांची पर्वा न करता ते शत्रुशी लढत होते. डर, भीती, म्हणजे काय हे महार सैनिकांना माहित नव्हते. बस शत्रूचा नायनाट कसा करायचा, हे त्यांना माहित होते. शेवटचा श्वास असे पर्यंत महारसैनिक लढत होते. जिकडे बघावे तिकडे पेशव्यांचे मुडदे पडलेले होते. कुणाचा हात, तर कुणाचे डोके कलम करण्यात आले होते. एवढ्यात ब्रिटीश सैनिकाने आपल्या कमांडरास माघार घेण्याचा निर्णय सांगितला. तेव्हा या घटनेची कुणकुण महारसैनिकांना लागली तेवढ्यात एक महारसैनिक जोरात कडाडला , `साहब, डरो मत... और भागने की मत सोचो... ये महार सैनिक अपने जान की बाजी लगा देंगे' हे धाडसी शुरवीर महारसैनिकांचे विचार ऐकून ब्रिटीश अधिकाऱयांचा उत्साह अजुनच वाढला. महारसैनिक किती बलवान शक्तीशाली शुरवीर आणि धाडसी आहेत. हे ब्रिटीश सैन्यांनाही कळून चुकले होते. महारसैनिक आणि पेशव्यात तुंबळ युद्ध सुरूच होते. जवळपास महारसैनिकांनी पेशव्यांची दाणादाण उडवली होती. अनेकांना धरणीवर लोळविले होते. ब्रिटीश सैनिक थोड्याफार पमाणात डगमगत होते. पण महारसैनिक मुळीच डगमगत नव्हते. उलट महारसैनिक कडाडले `साहेब आखरी गोली आखरी दुश्मन ' शेवट दुश्मनला शेवटच्या गोळीने आम्ही ठार करू.
महारसैनिक मरणाला कधीच घाबरत नाही. तलवार, चालाखबुद्धी आणि मनगटाच्या जोरावर लढाई चालूच ठेवली. तलवारीला तलवार भिडत असलेल्या आवाज सैनिकांच्या कानात गुंजत होता. घनघोर चाललेल्या लढाईत सैनिकांच्या अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. बरेच सैनिक रक्ताने माखले होते. या लढाईत पेशव्यांचा सरसेनापती बापू गोखले यांचा थोरला मुलगा बाबा लढाईत मारला गेला होता. त्यामुळे ही खबर बापू गोखल्यांच्या कानावर पडली त्यामुळे पेशवे सैनिक घाबरून विचलीत झाले होते. त्यांचे अवसान गळून पडले. बापू गोखलेंनी आपल्या मुलाचा देह मांडीवर ठेवला आणि तो मोठमोठ्याने हांबरडा फोडू लागला. सुर्य उगवले का असतांनाही त्याला अंधार वाटू लागला होता. त्यामुळे पेशव्यांचे उरले सुरले सैनिक घाबरून जिकडे रस्ता मिळेल तिकडे सैरावैरा पळू लागले. पळण्यात आपली भलाई आहे नाही तर महारसैनिक आपल्याही ठार करतील. अशापद्धतीने पेशव्यांचा हजारो सैनिकांची महारसैनिकांनी दाणादाण उडवली तर काहींना पळती भूई थोडी करून टाकली. बापू गोखल्यांचा थोरला मुलगा या लढाईत मारला गेल्यामुळे बापू गोखल्यांची स्थिती नाजुक आणि भित्रत झाली होती.
ही लढाई 1 जानेवारी 1818 रोजी घडली. पेशव्यांनी केलेल्या जुलमांचा हा एकपकारे बदलाच होता. आधीच महार सैनिकांच्या उरात अन्याय आणि अत्याचाराची आग धगधगतच होती. कधीतरी ह्या आगीने अन्याय, अत्याचार करणाऱयांना धडा शिकवायचाच होता आणि तसेच घडले. या लढाईत जाबाज महारसैनिकांनी आपल्या जीवाचे रान करून त्याग आणि बलिदान देऊन भिमा कोरेगावच्या युद्धात विजय मिळवून दिला. आम्हाला आणि बहुजन समाजाला सार्थ अभिमान राहिल.

या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हा रे !


जयभीम म्हणजे ...

जयभीम म्हणजे स्वान्त्र्याची युगयात्रा
जयभीम म्हणजे नंदादीपाप्रमाणे स्वतःला  जाळून घेणारा 
जयभीम म्हणजे अज्ञान , अंधकार  प्रकाशमय  करणारा 
जयभीम म्हणजे  धाम्म्प्रदीप 
जयभीम म्हणजे  अन्यायाशी  अविश्रांत झुंज 
जयभीम म्हणजे रूढी , परंपरा,  अंध्श्र्धेवरील अटम्बोम्ब
जयभीम म्हणजे  असंख्य अबलांचे अश्रू पुसणारा 
जयभीम म्हणजे पददलितांचे स्म्र्तीस्थान, आश्रयस्थान 
जयभीम म्हणजे बौद्धांचे उगमस्थान 
जयभीम म्हणजे बौद्धांचा बौधीवृक्ष
जयभीम म्हणजे  सुबोध , ओजस्वी , आदर्श , विद्वता प्रचुर वक्तृत्व 
जयभीम म्हणजे ज्ञानयोगी , कर्मयोगी, राजयोगी 
जयभीम म्हणजे निरामिष, प्रेममय ,नीतीचा परम आदर्श 
जयभीम म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन 
जयभीम म्हणजे नवसमाज निर्माण 
जयभीम म्हणजे संविधान शिल्प्कारिता 
जयभीम म्हणजे महात्मा गांधीचे प्राणदान 
जयभीम म्हणजे भारत भाग्य विधाता 
जयभीम म्हणजे महासागरासारखे विशाल  अंतकरण 
जयभीम म्हणजे हिमालयासारखी प्रचंड बुद्धिमत्ता            



क्रांतीज्योती आणि क्रांतिसूर्य


22 प्रतिज्ञा

बाबासाहेबानी नाग भूमित एक अभूतपूर्व सोहळ घडवून आणला. हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचा तो सोहळा म्हणजे हिंदुंच्या जातियवादावर घातलेला घणाघाती घाव तर होताच. पण  धर्मांतराची दुसरी बाजू म्हणजे दास्यात खितपत पडलेल्या अस्पृश्यांना आत्मसन्मानाने जगण्याच्या नव्या वाटा दाखविणार हा सोहळा होता. दलिताना हजारो वर्ष  गुलामीत ठेवणारे देव देवता नाकरणे या धम्मसोहळ्यातील एक मुख्य़ भाग होता. नुसतं धम्म स्विकारुन काही होणार नाही हे बाबासाहेब्न जाणून होते, त्यामुळे त्यानी देवाचा बंदोबस्त करणा-या बावीस प्रतिज्ञा तयार केल्या. त्या लोकांकडून वदवून घेतल्या. बाबासाहेबानी बौद्ध धर्माला दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालिल प्रमाणे आहेत
१) मी ब्रम्हा, विष्णु व महेश याना देव मानणार नाही व त्यांची पुजा करणार नाही।
२) मी राम व कृष्ण याना देवाचा पुनरजन्म मानत नाही व त्यांची पुजा ही करणार नाही।
३) मी गौरी गणपती व ईतर कुठल्याही देविला मानत नाही व पुजाही करणार नाही।
४) मी देवाचा पुनरजन्म मानत नाही।
५) मी बुद्धाला विष्णूचा अवतार मानत नाही, हा एक अपप्रचार आहे।
६) मी श्राद्ध करणार नाही व पिंडदान करणार नाही।
७) मी बुद्धाच्या शिकवणुकीच्या विसंगत वागणार नाही
८) मी कुठलेही कार्य ब्राह्मणाच्या हस्ते करणार नाही
९) मी सगळ्या मानव जातिला समान मानतो.
१०) मी समानता प्रस्थापीत करण्यासाठी कटिबद्ध राहीन
११) मी बुद्धाने सांगितलेला अष्टप्रधान  मार्गाचे पालन करेन।
१२) मी बुद्धाने सांगितलेल्या १० पारमितांचे पालन करेन।
१३) मी समस्त प्राणीमात्रावर प्रेम करेन व त्यांचे रक्षण करेन।
१४) मी चोरी करणार नाही।
१५) मी खोटे बोलणार नाही।
१६) मी वैषयीक अपराध करणार नाही।
१७) मी मद्यपान व इतर कुठेल्याही नशेचे सेवन करना नाही।
१८) मी अष्टांग मार्गाचे पालन करेन आणी दया, करुना व प्रेमाचे रोज आचरन करेन।
१९) मी मानव जातीच्या विकासात बाधा घालणा-या व जातिभेद करणा-या या हिंसक अशा हिंदु धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्विकार करतो आहे।
२०) मी फक्त बुद्धांच्या धम्मावर विश्वास ठेवतो।
२१) मी बौद्ध धम्माचा स्विकार करतो, अन हाच माझा पुनरजन्म आहे असे मानतो।
२२) मी अशी प्रतिज्ञा घेतो की, या नंतरचे माझे जीवन मी बुद्ध व त्यांचा धम्म यांच्या शिकवणुकी प्रमाणे जगणार॥

पुस्तक परिक्षण:-


महार कोण होते? उदगम, संक्रमण, झेप


महार समाजाचा तेजस्वी इतिहास यथावत मांडणारा शोधग्रंथ प्रसिद्ध लेखक व माझे मित्र संजय सोनवणी साहेबानी लिहला असून तो उद्या प्रकाशित होत आहे. या ग्रंथाचे नाव आहे “महार कोण होते, उदगम, संक्रमण, झेप”. आता पर्यंत अनेकानी महार समाजावर संशोधन केले. पण हे सर्व संशोधन महारांचा गौरवशाली इतिहास सांगण्यात तोकडे पडायचे.  अनेकांच्या व्याख्या, शब्दव्युत्पत्ती तर अयशस्वी खटाटोप सदरात मोडणा-या आहेत. महार समाज या मातीतला एक प्रमूख, प्रबळ नि शूर समाज होता हे सर्वाना मान्य होते पण संशोधनाच्या अभावापोटी ते सिद्ध करता  येत नव्हते.
संजय सोनवणी साहेबानी महार समाजावर अत्यंत महत्वाचे संशोधन केले. कालचा महार हा मध्ययुगात सामाजिक फटका बसलेला एक रक्षक होता हे सिद्ध करताना या समाजाची पाळं मुळं एक एक शतक मागे मागे नेत अर्वाचीन काळातील अस्तीत्व ने जबाबदा-या यांचे सखोल विवेचन केले आहे. त्याच बरोबर आजून एक एक शतक मागे मागे सरकत या समाजाची प्राचिन काळातील भूमिका ही ’रक्षक’ अशी होती व गाव कुशीवरील अत्यंत जबाबदारीचे कार्य पाहणारा, वेशीवर पहारा देणारा, समाजाचे व गावाचे रक्षण करणारा नि गावातील उत्पन, जमिनी व ईतर सर्व सरकारदरबारी आवश्यक नोंदी ठेवणारा हा समाज होता हे सिद्ध केले आहे.
महार सुशिक्षित असल्याचे पुरावे
त्याच बरोबर संजय साहेबानी हे ही सिद्ध केले आहे की जर या समाजावर अशा विविध जबाबदा-या होत्या तर हा समाज नक्कीच सुशिक्शतही होता. कारण नोंदी ठेवणे वगैरे गोष्टीसाठी  विद्येची गरज अपरिहार्य आहे. जर या समाजावर असे अत्यंत जबाबदारीचे (रेव्हेन्य़ु) कार्य सोपविले होते तर मग  ते अशिक्षित असून चालणार नव्हते. मग संजय साहेबांचा शोध सुरु होतो ते महारांच्या शिक्षणाच्या दिशेनी. महार समाज प्राचीन, अर्वाचीन व मध्ययुगीन काळात नक्कीच सुशिक्षित होता व कुठेतरी त्याचा पुरावा नक्की सापडेल नि तो शोधलाच पाहिजे म्हणून ते जिद्दिने पेटून उठतात. शेवटी या काळात महार सुशिक्षित होते याचा पुरावा ते मिळवतात. ते पुरावे काय आहेत? कसे मिळाले?  महार खरच सुशिक्षित होते का? या सर्व प्रश्नांचे उत्तर या पुस्तकात संजय साहेबानी पुराव्यानिशी मांडले आहेत. ते जाणून घ्यावयाचे असल्यास पुस्तक नक्की वाचा.
महार समाज धर्मांतरा आधी बौद्ध असल्याचा पुरावा
दुसरा अत्यंत महत्वाचा शोध असा आहे की बाबासाहेबानी धम्मचक्रप्रवर्तनाद्वारे जी धम्म क्रांती घडवून आणली त्या आधीही हा महार समाज कधी बौद्ध होता का? बहुतेक होता असेच उत्तर मिळते. यावर संशोधन करताना संजय साहेबानी एक असा पुरावा मांडला आहे की तो वाचून समस्त बौद्ध समाज थक्क होणार आहे. महारांची देवी मरीआई. महार समाजावर मरीआईचा मोठा प्रभाव. पण या मरीआईला बौद्धेय म्हटल्या जात असे असा पुरावा या पुस्तकात मांडण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की महार  समाजावर बौद्ध धम्माचा प्रभाव आधीसुद्धा होता. ते कसे.... जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.
ब्राह्मणांचा राष्ट्रद्रोह
संजय साहेबांच्या ठायी असलेले विदवत्तेचे भांडवल अफाट आहे. ज्याच्या बळावर ते अखंड वादविवाद करु शकतात. या त्यांच्या विद्वत्त्तेची चमक उपरोक्त पुस्तकातून अनेक ठिकाणी जाणवून जाते. प्रत्येक गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध करताना कित्येक ठिकाणी तर्काच्या कसोट्या लावून अत्यंत क्लिष्ट नि गुंतागुंतीचे प्रश्न निकाली काढतात. या देशावरील परकीय सत्तेचे गमक उलगडताना त्यानी एक स्फोटक संशोधन मांडले आहे.  काशी विद्वदसभा व ईतर सर्व पुराणकारानी “या देशावर यवनांचे राज्य येईल” हे वारंवार लोकांच्या मनावर बिंबवून दिले. म्हणून शत्रू सीमेवर उभा ठाकण्या आधीच आमचे मानसिक खच्चिकरण झाले. हा हा म्हणता एक दिवस यवन सिमेवर उभा ठाकला. आम्ही अनेक वर्षापासून त्यांची सत्ता येणार हे ऐकून असल्यामूळे आधिपासून मानसिक पातळीवर खचलेले होतो.  त्याना पाहून आजूनच खचून गेलो व त्यांची सत्ता स्विकारली. त्या नंतर ब्राम्हणानी धर्मसत्ता व मुस्लिमानी राजसत्ता अशी त्यांच्यात्यांच्यात वाटणी झाली व पुढे सातशे वर्ष आम्ही या दोघांचेही गुलाम राहिलो. आज पर्यंतच्या सर्व संशोधनाना नवे वळण देणारे हे संशोधन व असे अनेक अकथीत पुरावे पाहण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.
अशा प्रकारे संजय साहेबांची लेखनी विविध क्षेत्रातून लिलया फिरते व ती थेट इसवी सन पूर्व सातवाहनाच्या काळा पर्यंत महार समाजाचे अस्तीत नेऊन भिडविते. सातवाहनाच्या काळातील महारख्ख, महारठ्ठ, रठ्ठ अशा अनेक शब्दांचा अर्थ सांगत त्या काळातील गाव रक्षकांचा, संपत्ती रक्षकांचा नि व्यापा-यांच्या रक्षकांचा इतिहास सांगताना हे रक्षक कोण होते याची इत्यंभूत माहिती देते.  एके काळी हा देश आंतराष्ट्रीय पातळीवर व्यापार करण्यात अग्रणी समजला जात होता. त्या वेळी व्यापा-याना मोठ्या प्रमाणात रक्षकांची गरज पडत असे. त्यामुळे रक्षक समाजाची मोठी मागणी होती. हाडाने खणखर, बुद्धिने चाणक्ष नि वृत्तीने वीर अशा लोकांची नितांत गरज असे. आजच्या भाषेत बोलायचे झाल्यास रक्षक वर्ग हा सेवा (सेक्युरिटी) देणारा वर्ग होता. हा रक्षकांचा तेजोमय काळ सातव्या-आठव्या शतका पर्यंत अस्तीत्वात होता.  पण हळू हळू यवनांचे राज्य प्रस्थापित झाल्यावर व्यापार बंद झाले. त्यामुळे रक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावर  बेरोजगार झाला. त्याची अवणती सुरु झाली. हळू हळू त्याची एक वैभवशाली सेवा गावातील पाटल्याच्या, कुणब्याच्या घरी गहाण पडू लागली व ईथे सुरु झाली गुलामी. या गुलामीची पाळं मुळं कुणाशी जाऊन मिळतात? का बरं एक पराक्रमी नि शूर समाज हतवीर्य होऊन अस्पृश्य बनला? कोणत्या समाजानी यांच्यावर आघात केला?  कशा प्रकारे एका अप्रतिम सेवाक्षेत्राला महारकीत बदलण्यात आले? हे सर्व जाणून घेण्यासाठी वरील पुस्तक नक्की वाचा.
जाता जाता संजय साहेबानी या पुस्तकात आंबेडकर चळवळीतील राजकीय आघाडीचा समाचार घेताना अत्यंत मर्मभेदक, मनोवेदक नि मार्गदर्शक चर्चा केली आहे. त्यांची संशोधनाची शैली, अविरत कष्ट नि जिज्ञासू वृत्ती याचा परिपाक म्हणजे “महार कोण होते? उद्गम:संक्रमण:झेप
सर्वानी आवर्जून वाचावे नि संग्रही ठेवावे, असे पुस्तक आहे.
------------------------------------------------
पुस्तकाचे नाव:  महार कोण होते? उद्गम:संक्रमण:झेप
प्रुष्ठ संख्या :  ११२
मुल्य: रु. १००/-
प्रकाशक: पुष्प प्रकाशन
एकमेव वितरक: भारत बुक हाउस,
१७८८, सदाशिव पेठ, देशमुखवाडी, पुणे-३०.
मो. ९८५०७८४२४६